शेतकरी गजानन लाड यांना सरपंच सूरज कदम यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

गवताला आग लागून झालेल्या नुकसानीची घेतली दखल 

 

 

स्वप्निल कदम कुडाळ-

गोठोस येथील शेतकरी गजानन लाड यांच्या गवताला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गवत जळून खाक झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच गोठोसचे सरपंच सूरज कदम यांनी तत्परतेने पुढाकार घेत शेतकरी गजानन लाड यांना स्वखर्चातून रोख आर्थिक मदत देत माणुसकीचे दर्शन घडविले.

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक अथवा आकस्मिक संकटांमुळे नुकसान झाल्यास त्यांना आधार देणे गरजेचे असते. याच भावनेतून सरपंच सूरज कदम यांनी गजानन लाड यांच्या अडचणीची दखल घेत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे लाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी सद्गुरू घावनळकर, शाखाप्रमुख महादेव कदम, श्रीरंग सावंत, झिलू वरक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सूरज कदम यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.