कोलगावच्या श्री देव कलेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव २७ नोव्हेंबरला!

सावंतवाडी : कोलगाव येथील प्रसिद्ध श्री देव कलेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी श्री देव कलेश्वराची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात येणार असून, भाविकांकडून नारळ ठेवण्याचा धार्मिक विधी पार पडणार आहे. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

त्यानंतर रात्री १ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या वार्षिक जत्रोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांनी व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कलेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.