माडखोल-धवडकी येथील अवधूताश्रमात प. पू. अवधूतानंद महाराजांचा २० वा पुण्यतिथी महोत्सव

माडखोल । लखन आडेलकर : ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांच्या वतीने प. पू. अवधूतानंद महाराजांचा २० वा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार, दि. १० डिसेंबर ते शनिवार, दि. १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. हा तीन दिवसीय सोहळा माडखोल – धवडकी (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील रुना हॉटेलच्या वरील बाजूस असलेल्या ‘अवधूताश्रम’ येथे संपन्न होणार आहे.

​महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. १० डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, ५ वाजता श्रींच्या समाधीस अभिषेक व पंचोपचार पूजा, तर ५.४५ वाजता विणा पूजन होणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘ॐ श्री सद्गुरू समर्थ । स्वामी समर्थ ॥’ या गुरुमंत्राचे अखंड नामस्मरण चालेल, तर दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत अखंड महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल. सायंकाळी ६.३० वाजता धूप, दीप व आरती झाल्यानंतर ७ वाजता ह. भ. प. श्री प्रभंजन भगत (शिर्डी) यांचे ‘श्री साईनाथांची नवविधा भक्ती’ या विषयावर सुश्राव्य कीर्तन होईल. रात्री १० वाजता किराणा घराण्याचे ख्यातनाम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत व नाट्यगीत गायक पं. कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) यांची ‘भक्तिसंगीतरजनी’ रंगणार आहे.

​पुण्यतिथीचा मुख्य दिवस असलेल्या शुक्रवार, दि. ११ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्रींच्या समाधीस महापूजा व पंचसुक्तांचा सामूहिक अभिषेक होईल. सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण आणि ८ वाजता लक्ष्मी नारायण आदि संलग्न देवतांची पंचोपचार पूजा पार पडेल. सकाळी ११ वाजता प. पू. नामदेव महाराज भक्त परिवार (सिंधुदुर्ग) व प. पू. राऊळ महाराज यांचे वंशज श्री. राजेश राऊळ यांचे सुश्राव्य भजन होणार असून दुपारी १२.३० वाजता आरती होईल. दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद सुरू राहील. दुपारी १.३० वाजता श्री. अंकुश सांगेलकर व सहकारी (सांगली) यांचे भजन, तर सायंकाळी ४ वाजता ह. भ. प. श्री प्रभंजन भगत (शिर्डी) यांचे ‘श्री साईनाथांची नवविधा भक्ती’ या विषयावर कीर्तन होईल. सायंकाळी ६.३० वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीस पोशाख चढवण्यात येईल आणि ७ वाजता धूप, दीप, आरती व पालखी सोहळा निघेल. रात्री ११ वाजता पारंपरिक दशावतार लोककला नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग (वेंगुर्ला) यांचे ‘हेरंब जननी महामाया’ हे दशावतारी नाटक सादर केले जाईल.

​महोत्सवाच्या सांगता दिवशी, शनिवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्रींच्या समाधीस महापूजा व पवमान अभिषेक होईल. सकाळी ९ वाजता ह. भ. प. श्री सदाशिव पाटील (आंदुर्ले) यांच्या काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता दहीहंडी, १२.३० वाजता आरती आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या समाधी मंदिर बांधकाम, गोशाळा, अन्नदान सेवा आणि अभिषेक सेवा या उपक्रमांत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.