नामांकित चित्रकार व रांगोळी कलाकार हरपला
हळवल पंचक्रोशीत शोककळा
कणकवली : शहरालगतच्या हळवल मधलीवाडी येथील रहिवासी आणि नामांकित चित्रकार व रांगोळी कलाकार सूरज अविनाश राणे (वय २७) यांचा राहत्या घरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. सूरज याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सूरज राणे हे एक उत्कृष्ट चित्रकार होते. हुबेहूब रांगोळी साकारण्याच्या त्यांच्या कलेमुळे ते विशेष प्रसिद्ध होते. भारतीय डाक विभागाच्या बोर्डवे येथील कार्यालयात ते कार्यरत होते. तसेच त्यांनी हळवल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. अल्पवयातच कलागुणांनी आणि सामाजिक कार्यातील सहभागाने त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
हळवल गावचे माजी तंटामुक्ती समिती सदस्य अविनाश राणे यांचे पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.
सूरज राणे यांच्या अकाली निधनाने हळवल पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. हळवल येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.













