आबलोली पागडेवाडी अंगणवाडी येथे पोषण महिन्याची सांगता

आबलोली : महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘सही पोषण, देश रोशन’ चा नारा देत अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबर हा पोषणमाह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गुहागर तालुक्यातील अंगणवाडी आबलोली पागडेवाडी या ठिकाणी पोषणमाहाची सांगता बाळ गोपाळ पंगतीने करण्यात आली.

बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर, बीट पर्यवेक्षिका रसिका माटल यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी आबलोली पागडेवाडी येथे पोषण माह मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. पोषण आहाराचे महत्व पालकांना पटवून देण्यात आले. कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन मूठभर धान्य योजना राबवताना पौष्टिक खाद्याविषयी माहिती देण्यात आली. पौष्टिक खाद्यपदार्थ एकत्रित करून त्यांची प्रतीकात्मक हंडी फोडण्यात आली आणि त्यातील पदार्थ बालकांना खायला देण्यात आले. आपल्या आहाराविषयी, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छते विषयी बालकांना, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच वैष्णवी नेटके डॉ.स्नेहल निवाते यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्याविषयी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.

बाळ गोपाळ पंगतीच्या वेळी पालकांनी विविध प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ बनवून आणले होते. त्या पदार्थांचे महत्त्व बालकांना सांगण्यात आले.सर्व बालकांनी बाळ गोपाळ पंगतीत विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
संपूर्ण पोषण महिन्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक यांच्या सहकार्याने अंगणवाडी सेविका सुनीता पवार व मदतनीस स्वाती पागडे यांनी प्रयत्न केले. पोषण महिना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे अंगणवाडी सेविका सुनिता पवार यांनी आभार मानले.