गुटखाप्रकरणी संशयित ३३ दिवसांनी अटकेत

crime

खेड| प्रतिनिधी :

खेड तालुक्यातील लोटे येथील एका पानटपरीतून जप्त करण्यात आलेल्या गुटखाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

२ ऑक्टोबर रोजी धाड टाकून प्रतिबंधित गुटख्याचा सुमारे ७७, ८१४ रुपये किमतीचा साठा खेड पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी मोहमद इब्राहीम पालनगिरी हानिफा, (४२, रा. विश्वंभर बिल्डिंग, पहिला मजला, लोटेमाळ, ता. खेड, रत्नागिरी, मूळ रा. पालनगिरी हाऊस, कोडलमगुरू, ता. मंजेश्वरा, जि. कासारगोड, केरळ)
याच्यावर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा संशयित आरोपी पोलिसांना सापडत नव्हता.

पोलिसांच्या गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताला ३ नोव्हेंबर रोजी २०:१५ वाजण्याच्या सुमारास लोटे येथील राहत्या घरातून अटक करून शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून स्मिता कदम यांनी काम पाहिले. गांजा प्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई अधिक कडक केली आहे.