पद भरणा बाबत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेमधील रचना सहाय्यक हे पद रिक्त आहे. कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी रचना सहाय्यक हे पद तात्काळ भरून मिळावे. सदर रिक्त पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन दयावा जेणेकरुन मालवण शहरातील नागरीकांची विहित मुदतीमध्ये कामे करण्यास सुलभ होईल. असे मागणी निवेदन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.
मालवण नगरपरिषदेमधील नगरचना विभागामधील श्री. निलेश घाडगे, रचना सहाय्यक, गट-ब यांची 28 एप्रिल 2023 रोजी बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार “रचना सहाय्यक, श्री. विदयासागर अतिग्रे, यांचेकडे सोपविण्यात आलेला होता. परंतु विदयासागर अतिग्रे, रचना सहाय्यक यांची ऑक्टोबर 2023 रोजी तात्काळ बदली झालेली असल्याने मालवण नगरपरिषदेमधील रचना सहाय्यक हे पद रिक्त आहे. त्यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाज व शासकीय कामकाज हाताळतेवेळी इतर विभागामधील कर्मचा-यांच्या तसेच नागरीकांच्या कामामध्ये अडचणी येत असून त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद हद्दीमधील नविन इमारत बांधकामांना परवानगी देणे, भोगाधिकार प्रमाणपत्र, व्यवसाय नाहरकत दाखला, माहितीच्या अधिकारामधील विहित मुदतीमध्ये, माहिती देणे, झोन व भाग नकाशा, नकाशा वाचन करणे, प्रधानमंत्री आवास योजनेखालील प्रलंबित प्रकरणे या सारख्या खाजगी व शासकीय कामकाजावर विहित मुदतीमध्ये कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याण मंडळाकडून योजना राबविण्यात
आलेली आहे त्या योजनेमधील बांधकाम कामगारास देण्यात येणारे शिफारस प्रमाणपत्र मुदतीमध्ये सादर करणे बांधकाम कामगार यांना शक्य होत नसल्याने सदर योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरीकांला घेणे अशक्य आहे. वरील कामे लक्षात घेता “रचना सहाय्यक” हे पद रिक्त असल्याने नागरीकांचा रोष इतर विभागामधील कर्मचा-यांना सहन करावा लागत आहे.
तरी आपल्या स्तरावरुन नगरपरिषद नगररचना विभागामध्ये (मंत्रालय) यांना योग्य सुचना देऊन रचना सहाय्यक हे तात्काळ पद भरून मिळावे. तसेच सदर रिक्त पद भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन दयावा जेणेकरुन मालवण शहरातील नागरीकांची विहित मुदतीमध्ये कामे करण्यास सुलभ होईल, ही नम्र विनंती आहे.
असे मागणी निवेदन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.












