दापोली Breaking : पाळंदे समुद्रकिनारी आढळलेला तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली

धक्कादायक माहिती आली पुढे 

दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्र किनारी एका 17 वर्षीय अल्पवयिन मुलीचा मृतदेह शनिवारी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्या युवतीची ओळख पटली असून ती ओझरवाडी, चिपळूण येथील दक्षा मिलिंद माने (वय 17) असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाविद्यालयात जाते असे घरी सांगून घरा बाहेर पडलेली दिक्षा घरी न आल्याने चिपळूण पोलीस स्थानकात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. दक्षा तिथे कशी पोहोचली, तिच्याबाबत नेमके काय झाले याची माहिती आत्ता पोलीस घेत आहेत.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्र किनारी शनिवारी अनिल आरेकर हे फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांना तेथील वाळूत रुतलेल्या अवस्थेत एका तरुण मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती दापोली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून या मुलीचा मृतदेह दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला.

दरम्यान चिपळूण पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तक्रार दाखल करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांना दापोली येथे बोलवून घेतले व पाळंदे किनाऱ्यावर सापडलेल्या मुलीचा मृतदेह या नातेवाईकांना दाखवील्यावर तो आपल्याच भाचीचा असल्याचे नातेवाईकानी सांगितले.

दक्षा मिलिंद माने वय 17, रा. ओझरवाडी, चिपळूण असे या मृत मुलीचे नाव असून ती 5 जानेवारी रोजी महाविद्यालयात जाते असे सांगून गेली होती, सायंकाळी ती घरी परत न आल्याने त्या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्यात ती अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करत आहेत.