इस्कॉनच्या वतीने राजापूरात सोमवारपासून रामकथा सप्ताहाचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नामहट्ट केंद्र राजापूर यांच्या वतीने सोमवार १५ ते रविवार २१ जानेवारी या काळात राजापूर हायस्कुल पटांगणावर रामायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना देशभरात राम नामाचा जागर होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इस्कॉनच्या वतीने या रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताह काळात सायंकाळी ७:०० ते ९:३० कीर्तन आणि प्रवचन होणार आहे. कथावाचक श्रीमान श्रीरामचंद्र दास हे रामकथेचे निरूपण करणार आहेत.

या अध्यात्मिक पर्वणीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सनातन हिंदु परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

———————————————-