खेड दापोली मधील ७२ गावा मध्ये सौर पथदिवे

खेड(प्रतिनिधी) कोंकणातील ७२ छोट्या गावांमध्ये डॉ. सचिन शिगवण द सोलार मॅन ऑफ इंडिया आणि त्यांच्या ग्रीन इंडिया इनिशीएटिव्ह संस्थेच्या टीमने एका कंपनीच्या सी एस आर  फंडमधून अंधार असलेल्या रस्त्यांवर सौर पथदिवे लावून रस्ते प्रकाशित केले आहेत. ७२ हून अधिक खेड आणि दापोली तालुक्यातील गावांमध्ये सौर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले आहे
कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. परंतु अजूनही कोंकणात वीजेची समस्या भेडसावत आहे. रात्रीच्या वेळी बऱ्याचदा विजेचा लपंडाव चालू असतो. त्यामुळे गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागते.
कोंकणातील बरीचशी गावं ही आजु-बाजूने जंगलाने वेढलेली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस जंगली प्राण्यांचा वावर हा गावाच्या नजीकच्या परिसरात होत असतो. रात्रीच्या अंधारात सर्पदंश, विंचू चावणे असे अनेक प्रकार गावांमध्ये घडत असतात. डॉ. सचिन शिगवण – द सोलार मॅन ऑफ इंडिया यांनी त्यांच्या  टीमसह काही महिन्यापूर्वी कोंकणातील खेड आणि दापोली तालुक्यातील काही दुर्गम भागात जाऊन तेथील गावांचा सर्व्हे केला होता. गावातील विजेविषयीच्या समस्या जाऊन घेतल्या होत्या. तसेच त्यांच्यासाठी आपण मदत केली पाहिजे हे विचार घेऊन त्यांनी एका कंपनी च्या सी एस आर  फंड मधून निर्मिती या एनजीओ च्या सहकार्याने ६ ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दुर्गम गावांमध्ये २६८ सौर पथदिवे बसविले आहेत. हे सौर पथदिवे लावण्यासाठी  टीमसह ग्रामपंचायतीने आणि काही गावकऱ्यांनी श्रमदान केले होते त्यामुळे हा प्रकल्प अधिक चांगल्याप्रकारे झाला आहे.
या सौर पथदिव्यांमुळे गावातील रस्ते प्रकाशमय झाले आहेत. सौर पथदिव्यांमुळे शाळकरी मुलांना रात्रीच्या वेळेस खेळणे तसेच अभ्यास करणे सोपे होत आहे. महिलांना रात्रीच्या वेळेस घरा बाहेर पडताना सुरक्षित वाटू लागले आहे.
ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह संस्था ही भारतातील ग्रामीण क्षेत्रातील सौर शक्ति वापर विकासाठी प्रयत्नशील आहे. या उद्दिष्टाने, ७२ हून अधिक खेड आणि दापोली तालुक्यातील गावांमध्ये सौर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले आहे.
आजतागायत डॉ. सचिन यशवंत शिगवण यांच्या मार्गदर्शनखाली संपूर्ण भारतामध्ये ६०० हून अधिक गावांमध्ये सौर ऊर्जाद्वारे गाव व शाळा विकसित केले आहेत. त्यामुळेच त्यांना पूर्ण भारतभर ‘द सोलार मॅन ऑफ इंडिया ‘ या नावाने ओळखले जात आहे.
येणाऱ्या काळात अशा प्रकारचे अनेक प्रकल्प इतर ग्रामीण परिसरामध्ये अनेक  संस्थांच्या मार्फत राबवण्याचा ग्रीन इंडिया इनिशीएटिव्ह संस्था नक्कीच प्रयत्न असेल. येत्या २०२५ वर्षापर्यंत भारताच्या अनेक दुर्गम भागातील १००० गावांमध्ये सौर उर्जेद्वारे तेथील गावकरी तसेच शाळेतील विद्यार्थ्याना विद्युत पुरवठा करणे हे या संस्थेचे ध्येय आहे.