रत्नागिरी : येथील जीजीपीएस शाळेच्या (कै.) बाबुराव जोशी पंचकोशाधारित गुरूकुल प्रकल्प आणि रा. भा. शिर्के प्रशालेच्या (कै.) नानल गुरूकुल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पालकांची शाळा उपक्रमाचे आयोजन जोशी गुरुकुलमध्ये करण्यात आले. या उपक्रमामध्ये गुरूकुलचे ७० पालक सहभागी झाले.
शाळेची सुरवात सकाळी ८.३० वा. राष्ट्रगीत, उपासनेने झाली. त्यानंतर सूर्यनमस्कार योगाभ्यास झाला. पालकांची शाळा या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय बाल आणि महिला कल्याण केंद्राच्या प्रमुख अॅड. सौ. प्रिया लोवलेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्युत महामंडळाचे (मुंबई) जनसंपर्क प्रमुख संतोष पुरोहित, सौ. उल्का पुरोहित, गुरुकुल प्रकल्प प्रमुख किरण जोशी, किरण सनगरे यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमात प्रसारमाध्यमे, मोबाईल आणि विद्यार्थी या प्रमुख मुद्दयांवर त्याचे परिणाम व दुष्परिणाम यावर संतोष पुरोहित यांनी पालक, शिक्षक यांच्याशी चर्चात्मक सत्र घेतले. पालकांचे गटशः उपक्रम घेण्यात आले, त्यातून गुरुकुलमधील उपक्रमांचे आयोजन आणि परिणामकारकता याची जाणीव पालकांना करुन देण्यात आली. पालक शाळेच्या समारोप प्रसंगी अॅड. बाबासाहेब नानल गुरूकुल प्रकल्पाचे चेअरमन सीए उमेश लोवलेकर उपस्थित होते. याप्रसंगी दोन्ही गुरूकुलांना नेहमी तत्परतेने मदत करणाऱ्या माजी पालकांचा सत्कार करण्यात आला.
पालक आणि शिक्षकांनी येणाऱ्या काळात एकमेकांच्या सहकार्याने काम करावे. तरच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल असे मनोगत सीए उमेश लोवलेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन यांनी सदिच्छा भेट देऊन पालकांना, शिक्षकांना मार्गदर्शन केले. पालकांची शाळा यशस्वी होण्यासाठी दोनही गुरुकुलांचे सर्व शिक्षक व गुरूकुल प्रमुखांनी विशेष मेहनत घेतली.











