प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पोलिसांचे संचलन
वेंगुर्ले | प्रतिनिधी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी झालेल्या वादा नंतर संतप्त जमावाकडून दुकानांची तोडफोड केली. तसेच मशिदीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी सुमारे २५० जणांवर वेंगुर्ले येथील पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करीत बेकायदा जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी दिली. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात आज पोलिसांनी संचलन केले.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्याच्या रागातून निर्माण झालेल्या वादामुळे मोठ्या संख्येने हिंदू बांधव मंगळवारी रात्री वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे गोळा झाले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने नागरिकांनी आपला मोर्चा बाजारपेठेत वळवला. संतप्त झालेल्या काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत त्या ठिकाणी आपला राग व्यक्त केला. शहरातील दोन दुकाने, हातगाडया फोडण्यात आल्या मशिदीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी ठपका ठेवून लक्ष्मीप्रसाद मांजरेकर, मिनाद नाईक, प्रज्वल पालव, सिद्धेश ढवळे, मयुर आंगचेकर, यश गावडे, दुर्गेश आडारकर, प्रणव गवंडे, किरण गिरप यांच्यासह सुमारे २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.










