आचिर्णे विद्यालय येथे स्नेहमेळावा
वैभववाडी l प्रतिनिधी : तब्बल ३४ वर्षानी ते पुन्हा शाळेत आले. त्याच शाळेच्या वर्गात बसले. वर्गमित्र-मैत्रिणीच्या भरभरून गप्पा रंगल्या, ज्यांनी ज्ञानाची शिदोरी दिली त्यांचा यथोचित आदरतिथ्य करीत त्या काळातील शिक्षण आणि आजचे शिक्षण यावर विचारमथंन देखील केले. असे आगळेवेगळे वातावरण आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात दहावीची १९८९-९० च्या बॅचच्या स्नेहमेळाव्यात पाहायला मिळाले.
रयत शिक्षण संस्थेचे आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या १९८९-९० च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा शुक्रवारी विद्यालयाच्या सभागृहात झाला. या मेळाव्याला माजी शिक्षक एस. डी. पाटील, सौ.एस.एस.पाटील, आर.एस.कुलकर्णी, एम.एन.माने, ए.व्ही.जाधव, टी.एन.करडे, आर.पी.माळी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक चंद्रशेखर कारेकर, एम.एन.खोत, आदी उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्याला आलेल्या माजी शिक्षकावर पुष्पवृष्टी करीत वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सभागृहात आल्यानंतर एक आगळवेगळ वातावरण निर्माण झाले. ३४ वर्षानी वर्गमित्र आणि मैत्रिणी एकमेकांना आपल्या लाडक्या शिक्षकांना मनापासुन भेटत होते. एकमेकांशी विचारपुस करीत होते. या स्नेहमेळाव्यात कुठेही औपचारिकता नव्हती, त्यानंतर ३४ वर्षापुर्वीच्या आठवणींचा एक एक कप्पा शिक्षक आणि विद्यार्थी उलगडत गेले.
शाळा आणि शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळेच आम्ही यशाचे शिखर गाठु शकलो. त्यामुळे आमच्या आयुष्यातील शाळा आणि शिक्षकांचे स्थान कायम सर्वोच्च राहणार आहे. अशा शब्दात माजी विद्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्या काळात कोणत्याही मुलभुत या भागात नव्हत्या. टिव्ही नाही, फोन, मोबाईल असली कोणतीही साधने सभांषणाकरीता नव्हती. परंतु त्यामुळेच शिक्षकांमध्ये चांगली चर्चा घडायची त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष राहायचे. आपला विद्यार्थी हा मोठा झाला पाहीजे. त्यासाठी ते रात्रदिवस काम करीत असत. शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यामध्ये प्रचंड आदर असायचा आणि शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्याना कधी प्रेमाने तर प्रसंगी कठोर शिक्षा द्यायचे. मात्र त्यांचा हेतु विद्यार्थ्याचे हित एवढेच होते. त्यामुळे आजही समाजात शिक्षकांना मानसन्मान मिळत आहे. विद्यार्थ्याला छडी बसली तर कधी तक्रार येत नव्हती असे देखील काही माजी शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरतेशेवटी स्नेहभोजन झाले. त्यानंतर एकमेकांना निरोप दिला.३४ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर सर्वच जण भावुक झाले. आता एकत्र आलोय यापुढे कायम एकत्र राहुया, वर्गमित्र मैत्रिणींच्या सुखादुखात एक पाऊल पुढे राहुया, सकंटकाळात धावून जाऊया असा निर्धार करीत सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.
या कार्यक्रमाला सदशिव रावराणे, राजेश कदम, जया कडु, अनिल रावराणे, अनिल नावळे, जयस्त्री गुरव, शांती कदम, उषा सावंत, सुरेखा कदम, विजय जाधव, मारूती मांजलकर, प्रवीणा रावराणे, मंगेश मांजलकर, संदीप विचारे, यांच्यासह ५० हुन अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.











