वेंगुर्ले : प्रतिनिधी
आरवली सागरतीर्थ येथे उद्या होणाऱ्या महोदय पर्वणी साठी आज सायंकाळी कास येथील श्री देव रवळनाथ व श्री माऊली देवीचे शिरोडा बाजारपेठ येथे सांय. ५.३० वाजता आगमन झाले. तेथून आरवली येथे सायं. ६.०० वाजेपर्यंत मुक्कामी राहणार आहेत. या देवांच्या आगमन सोहळ्यामध्ये गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
आज गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता कास, ता. सावंतवाडी येथून अवसारी देव, तरंगकाठी सहीत चालत प्रस्थान झाले. सोबत ७०० ते ८०० भाविक पुरूष व महिला चालत आले. (२८ ते ३० कि.मी ) प्रवासात कोंडुरा, मळेवाड, आजगाव, शिरोडा या भागात या देवांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच स्थानिकांकडून चहापान सोय करण्यात आली होती. उद्या सकाळी हे देव समुद्रस्नानासाठी रवाना होणार आहेत.












