नवोदय विद्यालयात भेट देत घेतली कारभाराची झाडाझडती
विद्यार्थ्यांची विचारपूस : पालकांशी चर्चा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सांगेली येथील नवोदय विद्यालयात अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची राज्याच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. तसेच मंत्री केसरकर यांनी विद्यालयाच्या कारभाराची झाडाझडती घेत प्राचार्य एम.के.जगदीश यांना खडेबोल सुनावले.
सांगेली येथील नवोदय विद्यालयात झालेल्या विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा येथील कुटीर रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्याची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पालकांसोबतही चर्चा केली. त्यानंतर शनिवारी सकाळी नवोदय विद्यालयात जाऊन प्राचार्य एम.के.जगदीश यांच्यासह शिक्षकांशी चर्चा करीत या प्रकाराबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, सांगेली सरपंच लवू भिंगारे, गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक, शिक्षणधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यालयात भेट दिल्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर प्राचार्य जगदीश याच्याकडूनही माहीती घेतली. यावेळी प्राचार्यांच्या बोलण्यात मोठ्याप्रमाणात विसंगती आढळून आल्याने केसरकर यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. जे जेवण तुम्ही देता त्याची तपासणी केली होती का असा सवाल करत घटना घडल्यानंतर तुम्ही कुठे होता. एवढी मोठी घटना होऊन सुध्दा तुम्ही मुलांबाबत गंभीर का नाही. तुमच्या नियमा नुसार समित्या नेमण्यात आल्या आहेत का अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी त्यांनी विद्यालयातील कागदपत्रांची तपासणीही केली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही माहीती घेतली.
या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी अशी सुचना त्यांनी केली. या सूचनेनंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही आपण पालकांशी बोललो आहे. त्यांनी मला ज्या सुचना केल्या आहेत त्याची दखल घेतली आहे.मी स्वतः जेवणाची माहिती घेतली असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.












