भरणेत लागताहेत वाहनांच्या रांगा; परतीच्या प्रवासाचा परिणाम
खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. रेल्वेगाड्यांसह एसटी बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याने चाकरमान्यांना मुंबई गाठण्याची चिंता सतावत आहे. भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तासन्तास तिष्ठत बसणारे चाकरमानी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही वाहनातून प्रवास करण्यासाठी पुढे सरसावत असल्याने खासगी आराम बस व अन्य वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग घडत असून खासगी वाहनांचा भावही वधारला आहे.
शिमगोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी डेरेदाखल झाले होते. ग्रामदेवतांच्या पालख्यांचे दर्शन घेतल्यानंतर रविवारपासून चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीने धावत असल्याने प्रवाशांना आल्या पावली माघारी परतावे.. लागत आहे. हीच परिस्थिती एसटी बसेसची देखील असून जादा बसेस सोडूनही आरक्षित तिकिटे प्राप्त होत नसल्याने चाकरमान्यांना मुंबई गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी काही चाकरमानी आर्थिक भुर्दंड सहन करत मुंबई गाठत आहेत.
भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी गावी आलेले चाकरमानी महामार्गावरून धावणाऱ्या कोणत्याही वाहनातून जाण्यासाठी तासन्तास तिष्ठत बसत आहेत. खासगी आरामबसचालक चाकरमान्यांकडून अवाजवी भाड्याचे आकारणी करत असल्याने तिथेच अन्य वाहनांची प्रतीक्षा करत चाकरमानी तळ ठोकत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अन्य वाहनांमधून प्रवास करण्यासाठी चाकरमानी पुढे सरसावल्यास वाहने थांबवणाऱ्या खासगी आराम बस चालकांकडून दम भरला जात आहे. यामुळे शाब्दिक चकमकीचे परिणाम हमरातुमरीत होत आहेत.
एकीकडे भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी खासगी आराम बस चालकांकडून चाकरमान्यांची लूट सुरू असतानाही त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्याची तसदी येथील पोलीस यंत्रणेकडून घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खासगी वाहनांच्या भाडे आकारणीवर निर्बंध हवेत रेल्वेगाड्या अथवा एसटी बसेसमध्ये जागा न मिळाल्यास गावी आलेल्या चाकरमान्यांना कुटुंबासह मुंबई गाठताना कसरत करावी लागते. बऱ्याचवेळा खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सहन करत मुंबई गाठतात. मात्र सर्वच चाकरमान्यांना हे परवडणारे नाही. पोलीस यंत्रणेसह प्रादेशिक परिवहन विभागाने ही बाब गांभीर्याने घेवून चाकरमान्यांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी चाकरमान्यांकडून केली जात आहे










