वेंगुर्ले तालुक्यात सर्वर डाऊन मुळे ई-केवायसी होत नसल्याने शेतकरी हैराण..

तौक्ते वादळातील व अतिवृष्टीची नुकसान भरपाई येऊनही लाभार्थी वंचीत

वेगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यात सद्या सर्वर डाऊन मुळे केवायसी होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तौक्ते चक्रीवादळातील व अतिवृष्टीची नुकसान भरपाई येऊनही लाभार्थी या पासून वंचित असून शेतकऱ्यांना याचा शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास होत आहे.त्यामुळे याकडे वेंगुर्ले तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांनी त्वरीत लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष तथा वेगुर्ला तालुका राष्ट्रवादी कृषी सेल अध्यक्ष शामसुंदर राय यांनी वेंगुर्ले तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

वेंगुर्ले तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यानी दिलेल्या लेखी निवेदनात, तोक्ते वादळामधील नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची यादी प्रसिध्द झालेली आहे. या यादीत वेंगुर्ले तालुक्यातील सुमारे ४५० शेतकऱ्यांचा तर २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिक घेणाऱ्या बाधीत शेतकऱ्यांची सुमारे ३०० शेतकऱ्यांची यादी शासनाकडून प्रसिध्द झालेली आहे. परंतु ई-केवायसी करण्याची गरज असल्याने ई-के.वाय.सी. महा ई सेवा केंद्र अथवा सेतु सेवा केंद्र येथे शेतकरी गेले असता सातत्याने सर्वर डाऊनची समस्या गेल्या अनेक दिवसांत निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ई-के.वाय.सी. केल्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हि नुकसान भरपाई जमा होऊ शकणार नाही. अनेक शेतकरी वयोवृध्द असल्यामुळे महा ई सेवा केंद्र किंवा सेतु सुविधा केंद्र येथे जाऊनही सर्वर डाऊनची समस्या असल्याने ई-के.वाय.सी. होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे. यासाठी आपण वरील विषया संदर्भात तात्काळ लक्ष घालावा. अशी मागणी श्री. राय यांनी निवेदनाद्वारे केली आहे.