गुहागर l प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाची मंगळवारी सांगता झाली.यावेळी श्री सुकाई देवीची पालखी सहाणेवरून ग्रामदेवता मंदिरात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचवत आणण्यात आली.
येथील श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. होळीपासून सुरू होणारा शिमगोत्सव गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला जातो.यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. अशाच पद्धतीने यावर्षी देखील हा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात देवीची पालखी व माडवळ नाचवत मोठ्या उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पार पडला.
या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरली. त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालखी नाचवण्यासाठी भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या शिमगोत्सवात सहभागी झाल्याबद्दल ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीने सर्व भाविकांचे आभार मानले.












