सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरला १७२ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त १८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांना स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. मुंबईचे जेष्ठ पत्रकार, विचारवंत श्री विवेक मेहत्रे यांचे विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे .
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जी.ए. बुवा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून वाचनालयाचे माजी अध्यक्ष स्व. एडवोकेट दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गजानन नाईक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गजानन नाईक यांनी पत्रकारितेमध्ये गेली ५१ वर्षे सक्रिय काम करीत असताना सावंतवाडीतून १९८३ मध्ये दैनिक नव कोकणच्या रूपाने पहिले दैनिक सुरू केले त्यानंतर गेली तीस वर्षे दैनिक कोकणसाद चालवले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी प्रतिष्ठेची पदे त्यांनी भूषवली पत्रकारितेबरोबर विविध सेवाभावी संस्थेमधून त्यांनी काम केले आहे .
श्रीराम वाचन मंदिरच्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.












