रेल्वेच्या धडकेत कामगार मृत्युप्रकरणी समितीकडून सखोल तपास

खेड (प्रतिनिधी) सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या धडकेत एक मृत कामगार आणि अन्य पाच जखमी कामगार दुर्घटनेच्या तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गठीत केलेल्या ९ अधिकाऱ्यांची चौकशी समिती  येथील रेल्वेस्थानकात दाखल झाली असून याप्रकरणी सखोल तपास सुरू झाला आहे.
समितीच्या अहवाल प्राप्तीनंतरच अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. दुर्घटनेतील मृत यशवंत तुकाराम राठोड याचे मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली असून ही समिती येथे दाखलही झाली आहे. या समितीत रेल्वेच्या सिग्नल विभागाचे अधिकारी, दूरसंचार विभागाचे अधिकारी, ऑपरेटींग विभाग, इंजिनिअर आदी विभागातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीमार्फत . उशिरापर्यंत संबंधित ठेकेदारासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू होती. या दुर्घटनेस नेमका जबाबदार कोण, याचा उलगडा समितीच्या अहवाल प्राप्तीनंतरच होणार असल्याने साऱ्यांचे लक्ष अहवालाकडे लागले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या यशवंत तुकाराम राठोड याच्या मृतदेहाचे रात्री उशिरापर्यंत विच्छेदन झाले नव्हते. मृत कामगाराचा मुलगा मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बिजापूर-कर्नाटक येथून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनाचे काम हाती घेण्यात आले.  शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात सोपवण्यात आला. येथील पोलिसांकडूनही दुर्घटनेची चौकशी सुरू असल्याचे समजते.