लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघात १३०० शासकीय कर्मचारी कार्यरत

पोस्टल व ८५ वर्षावरील मतदारांचे सर्वाधिक ९५ टक्के मतदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ३०८ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी १३०० शासकीय कर्मचारी यंत्रणेत घेण्यात आले असून ६०० पोलीस कॉन्स्टेबल तर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी २०० महसुल विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून सोमवारी सावंतवाडी येथून अधिकारी व कर्मचारी ईव्हीएम मशीन व इतर मतदान सामुग्री घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख २४ हजार ४२१ मतदार आहेत. ८५ वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ८५ वर्षावरील एकूण ५२६ मतदारांपैकी ४८८ मतदारांनी मतदान केले आहे. तर ९०० पोस्टल मतदानापैकी ८४४ लोकांनी पोस्टल मतदान केले आहे. पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे सावंतवाडीत सर्वाधिक ९५ टक्के मतदान झाले आहे.

या मतदारसंघात ४२ सेक्टर पोलीस ऑफिसर असून मायक्रो ऑब्झर्वर ४० आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी ४० बसेसची सोय करण्यात आल्याचेही प्रांताधिकारी श्री. निकम यांनी सांगितले.