काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतक-यांना हमीभाव देण्याचा प्रयत्न – मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण सभा ; बाजार समिती सक्षम झाल्यास शेतक-यांना फायदा 

ओरोस : राज्यातील बाजार समितीच्या आढावा घेतल्यास आपण खूपच मागे आहोत. या बाजार समितीच्या सभेला आलेल्या सगळ्यांकडे शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे शेतक-यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम झाली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नांदगाव येथे होत असलेले मार्केट यार्ड शेतक-यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे. काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतक-यांना हमीभाव देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.

 

ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती तुळशीदास रावराणे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र राज्य काजू बोर्डाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार सभापती तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आनंद ठाकूर, मकरंद जोशी ,प्रसाद पाटकर, मकरंद जोशी , अजय आकेरकर, प्रदीप मांजरेकर, किरण रावले , वसंत तेंडोलकर, शंकर तावडे, लोरे सरपंच अजय रावराणे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, लोरे सोसायटी संचालक नरेश गुरव, अनंत राणे, सुनील रावराणे, रघुनाथ रावराणे, प्रदीपकुमार जाधव, कसाल ग्रा.प. सदस्य संजय वाडकर, पिसेकामते ग्रा.प. सदस्य सुहास कदम, झाराप सदाशिव माळवे, संचालक सूर्यकांत बोडके, सदानंद सावंत, अमोल विराजदार , वास्तुविशारद योगेश सावंत आदींसह बाजार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव रेल्वे स्टेशननजीक मार्केट यार्डसाठी जागा खरेदी करत मार्केट यार्डची उभारणी सुरु केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे , बॅंक अध्यक्ष मनीष दळवी , बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्यासह या कामासाठी योगदान दिलेल्या सर्वांचा शेतक-यांच्यावतीने अभिनंदनाचा ठराव असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी मांडला. या सभेत शेतक-यांच्या पिकाला हमीभाव , बाजार समितीचे उत्पन्न वाढीबाबत चर्चा झाली. त्याला सकारात्मक उत्तर सभापती तुळशीदास रावराणे यांनी देत आगामी काळातील संस्थेच्या धोरणांबाबत माहिती दिली. तसेच वास्तुविशारद योगेश सावंत यांनी मार्केट यार्डच्या इमारतींच्या बांधकामाबाबत व असलेल्या प्लानबाबत शेतक-यांना माहिती दिली.

 

 

बॅंक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग बाजार समितीचे काम सभापती तुळशीदास रावराणे मेहनत करुन करत आहेत. त्यामुळेच मार्केट यार्डेचे स्वप्न साकार होत आहे. राज्यातील एकमेव बाजार समिती आहे. त्यासाठी शासनाने विविध कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. बॅंकेकडे जमीन खरेदीसाठी कर्ज घेणे ही सोप्पी गोष्ट नाही ते धाडस सभापतींनी दाखवले . आता काजू बोर्डाच्या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांबरोबर आता बाजार समितीला फायदा होणार आहे. शेष बाजार समितीला मिळणार आहे. शेतक-यांनी पिक विमा रक्कम वेळेत मिळण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतल्यानंतर त्या कंपनीला जाग आलेली आहे. येत्या 15 दिवसांत शेतक-यांना विमा रक्कम मिळेल.

 

सभापती तुळशीदास रावराणे म्हणाले , महाराष्ट्र काजू बोर्डाच्या संचालक पदी निवड झाल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतक-यांना होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात अव्वल ठरणार आहे. कारण याठिकाणी आंबा , काजू , मासे यासह विविध घटक बाजार समितीत येणार आहेत. शेतक-यांना चांगला हमीभाव देण्याच्या दृष्टीने मार्केट यार्ड एक महत्वाचा केंद्र बिंदु असेल . मार्केट यार्डेचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात शेतक-यांच्या हितासाठी बाजार समिती काम करेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.