रत्नागिरी | प्रतिनिधी
घराच्या मागील बाजुस भिंत घालत असल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील चार जणांना जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 5 मे रोजी सकाळी 8.15 वा.सुमारास कुर्टेवाडी आंबेशेत येथे घडली.
सुनिता शंकर बाचरे, रसिका मनोज बाचरे, आदेश मनोज बाचरे (सर्व रा.कुर्टेवाडी आंबेशेत,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गणपत विठोबा बाचरे (रा.आंबेशेत,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादींनी त्यांच्या घराच्या मागील बाजुस चौथर्यावरील मोकळ्या जागेत भिंत घालण्यासाठी कामगार बोलावले होते. ते भिंत घालण्यासाठी चरी मारत असताना या गोष्टीचा राग मनात धरुन सुनिता बाचरे, रसिका बाचरे या दोघींनी गणपत बाचरे यांची पत्नी दर्शना आणि सून रश्मी या दोघींना हातांच्या थापटांनी मारहाण केली. तर आदेश बाचरे हातातील बॅटने गणपत बाचरे यांना मारहाण करत असताना त्यांचा मुलगा प्रशांत मधे पडला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










