खेड: महावितरणच्या जमिनीत गाडलेल्या वीज वाहिन्यांबाबत स्पष्ट सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत खोदकाम केल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मे. दिनेश इंजिनिअरिंगचे मुकादम राजेश हळदणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:४५ च्या सुमारास मौजे वेळळ येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर हॉटेल गणपती कृपाच्या विरुद्ध बाजूला घडली. महावितरणचे सहाय्यक अभियंता सिद्धार्थ सुनील पेटकर (वय २४, रा. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
राजेश हळदणकर (रा. संगमेश्वर) हे मे. दिनेश इंजिनिअरिंगसाठी या भागात भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम करत होते. खोदकाम सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संबंधित ठिकाणी वीज वाहिनी असल्याचे सांगून खोदकाम न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या खोदकामात महावितरणच्या ११ किलोव्होल्ट (11 KV) ‘भरणे फिडर’ची वीज वाहिनी तोडली गेली. या निष्काळजीपणामुळे महावितरणचे अंदाजे ३,७८,९०८ रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.











