शासकीय चलनाबरोबरच आगाऊ पैसे घेऊन देखील प्रकरण केले गहाळ
खेड (प्रतिनिधी)
खेड मधील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले असून शासकीय चलनाच्या पैशासह बिनशेती मोजणीसाठी अधिकचे पैसे घेऊन देखील प्रकरण गहाळ केल्याची तक्रार खेड तालुक्यातील असगणी मोहल्ला येथील गुलशन नेवरेकर आणि सहिदा चौगुले यांनी आज उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड व खेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे
खेड तालुक्यातील असगणी मोहल्ला येथील गुलशन रजबली नेवरेकर व संहिता मन्सूर चौगुले यांनी शुक्रवारी खेड पोलीस स्टेशन तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड या कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे एप्रिल २०२३ रोजी मौजे दाभिळ तालुका खेड येथील गट नंबर २०९ व २०८ या ठिकाणी बिनशेती मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय खेड या ठिकाणी अर्ज सादर केला ९ हजार रुपये चलनाचे शासकीय नियमानुसार पैसे भरले. या चलनाची पावती देखील संबंधित अधिकारी श्री भाटकर यांनी दिली नाही. तसेच प्रकरण करण्यासाठी अधिकचे ४५ हजार रुपये घेण्यात आले. असे एकूण ५४ हजार रुपये इतकी रक्कम देऊन सुद्धा वर्ष उलटले तरी देखील मोजणी झाल्यानंतर झालेल्या जमीन मिळकतीचे मोजणीचे नकाशे प्रत दिली गेली नाही.
भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता श्री भाटकर यांची बदली झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सादर केलेल्या त्या मोजणीचे प्रकरण कार्यालयात मिळून येत नसल्याचे सांगण्यात येते. म्हणजेच हे प्रकरण गहाळ झाले असून ते निकालात निघाले असल्याचे सांगून आमची फसवणूक केली असल्याची तक्रार गुलशन नेवरेकर आणि सईदा चौगुले यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड तसेच खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.
खरेदी केलेली जमीन बिनशेती केली, त्यानंतर बिनशेती केलेल्या जमिनीची मोजणीसाठी शासकीय चलना बरोबरच अधिकचे पैसे घेऊन देखील मोजणीचे नकाशे व प्रत न देता तसेच भरलेल्या चलनाचे पावती न देता फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.










