सकल मराठा समाजाची तहसीलदारांकडे मागणी
प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नाराज पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी
सावंतवाडी । प्रतिनिधी : मराठा समाजाला शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. मात्र, त्यांना दाखले देताना शासनाचे अधिकारी कायद्यावर बोट ठेवत दिरंगाई करीत आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांना ई डब्लू एसचे दाखले द्या, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, कोणाचेही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. परंतू शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जावून आम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दाखल्याचे प्रस्ताव सादर करा, आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेवू. मुलांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
नवीन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे अशातच मराठा समाजातील मुलांना दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आक्रमक झाले.
ज्या मुलांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्यांना ई डब्लू एस असे दाखले उपलब्ध करुन द्या. तसेच त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र करून घ्या म्हणजे भविष्यात कोणालाच अडचणी येणार नाहीत. मात्र, दाखल्या अभावी कोणत्याही मुलांचे नुकसान करू नका अशी मागणी त्यांनी केेली.
यावेळी आम्ही दाखले देण्यासाठी तत्पर आहोत. परंतू त्या ठीकाणी काही त्रुटी असल्यामुळे आमचे हात बांधील आहेत. डबल दाखले देता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व बाबी तपासूनच पुढील निर्णय घेणार आहोत, असे श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी तुम्ही मुलांना सहकार्य करीत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करु तसेच वेळ पडल्यास मुलांच्या भवितव्यासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच संतप्त झालेल्या पदाधिकार्यांनी कार्यालयाच्या बाहेर येवून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करीत घोषणाबाजी केली.
कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय जाणार नाही,मराठा समाज बांधवाच्या एकजूटीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी नाराजी व्यक्त केली. तहसिलदारांनी कायद्याचा बाऊ न करता मुलांना सहकार्य केले पाहीजे. आम्ही डबल आरक्षण मागत नाही. परंतू एक तरी आरक्षण द्या, अशी आम्ही मागणी केली होती. परंतू तहसिलदारांनी योग्य ती उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे, असे ते म्हणाले.
यावेेळी माजी माजी सभापती प्रमोद सावंत, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी नगरसेवक विलास जाधव, खेमराज कुडतरकर, गुणाजी गावडे, प्रा. सतीश बागवे, तारकेश सावंत, राघोजी सावंत, उमा वारंग, लवू लटम, सचीन सावंत, अजय सावंत, अमीत परब, बंटी माठेकर, महादेव सावंत, राजेश नाईक, राजू तावडे, युक्ता सावंत, दिया सावंत, श्रीराम पवार, काका मांजरेकर, सचिन कृष्णा सावंत, संदिप सावंत, मनोज घाटकर, संजय लाड, सरपंच विजय गावडे, संतोष परब, समीर शिंदे, अंकूश गावडे, नारायण राणे, शिवदत्त घोगळे, विनायक गुरव, अब्जू सावंत, महादेव राऊळ कैलास परब, गंगाराम घाटकर, विजय पवार, रोहन चव्हाण, प्रशांत मोरजकर, सुभाष गावडे, सुधीर राऊळ, राकेश परब, विजय बांदेकर, गंगाराम राऊळ, सुहास कदम, ऋषी सावंत, कोमल गावडे , प्रियांका निर्गुण आदि उपस्थित होते.












