कोकणातील विजयरथ यापुढेही असाच सुरू राहील : विशाल परब
सावंतवाडीत डावखरेंच्या विजयाचा जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयाचे खरे शिल्पकार हे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण असून आगामी काळातील निवडणुकीतही कोकणातील हा विजय रथ कायम राहील, असा विश्वास भाजप युवा मोची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, उमाकांत वारंग, दिलीप भालेकर, अमित गंवडळकर, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तसेच राज्यातील महायुती सरकारने गोरगरीब जनतेसाठी अंमलात आणलेल्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून जनतेला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी आमच्यासारखे पदाधिकारी कार्यकर्ते निश्चितच कार्यरत राहणार आहेत. त्याच प्रमाणे जनतेचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी देखील आमचे काम सुरू आहे. चा माध्यमातून भारतीय जनता पार्टी गावागावांत व घराघरापर्यंत नेणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्यावतीने उमेदवारीसाठी मी नक्कीच इच्छुक आहे. आपण गेली वीस वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक काम करत आलो आहे. हे काम यापुढेही असेच सुरू राहणार आहे.
पक्षाच्या कार्यातही मी सदैव सक्रिय आहे. त्यामुळे पक्षाला योग्य वाटल्यास पक्ष माझ्या नावाचा निश्चितच विचार करेल. परंतु कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा असणार असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निरंजन डावखरे यांच्या विजयाचा जल्लोष
फटाक्यांची आतषबाजी : मिठाई वाटप
कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या
विजयाबद्दल भाजयुमो राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वात विजयोस्तवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करीत व मिठाई वाटप करून यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या घोषणा देण्यात आल्या. कोकण हा अन्य कुठल्याही पक्षाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे समीकरण मागील काही कालावधीत कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवलेले आहे. कोकण पदवीधर निवडणूकीत ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे यावेळी विशाल परब यांनी सांगितले.












