भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती
लवकरच आणखी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, लवकरच आणखी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी दिली आहे. सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी भाजप नेहमीच अग्रेसर राहणार असून, सर्वांना विश्वासात घेऊन ही कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर माजी नगरसेवक मनोज नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, लवू भिंगारे, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लखमराजे भोसले म्हणाले की, भारतीय जनता पार्टी नेहमी विकासकामात अग्रेसर राहिली आहे. सावंतवाडी शहरात विकासकामांबरोबरच पर्यटन वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांची आम्हाला भक्कम साथ लाभणार आहे. त्यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत दोन कोटींची कामे मंजूर झाली असून, अजून एक कोटीची कामे मंजूर होणार आहेत. शहरातील प्रलंबित कामांबाबतचा आढावा रवींद्र चव्हाण यांनी घेतला होता आणि भाजपने सुचवलेल्या कामांना त्यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
*नगराध्यक्षपदासाठी सहा इच्छुक : श्रद्धाराणी भोसले यांच्या नावाला पसंती*
यावेळी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी नगरपरिषद निवडणुकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही सावंतवाडी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाच्या जागाही आम्ही लढवण्याची तयारी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असले तरीही तशा प्रकारची चाचपणी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे सध्या सहा इच्छुक उमेदवारांची नावे आली आहेत. यामध्ये राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांचेही नाव आहे. आम्ही त्यांच्या नावाची मागणी वरिष्ठ पातळीवर करणार आहोत. परंतु, नगराध्यक्ष पदाचा अंतिम उमेदवार कोण असेल, याचा निर्णय वरिष्ठ नेतेमंडळीच घेणार असल्याचे सुधीर आडिवरेकर यांनी स्पष्ट केले.













