विजयदुर्ग विठ्ठल मंदिर आषाढी सप्ताहाचा दिंडीने समारोप

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) विजयदुर्ग येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील यंदाच्या आषाढी हरीनाम सप्ताहाचा समारोप भव्य दिंडी काढून करण्यात आला. विठ्ठल मंदिरातून काढण्यात आलेली ही दिंडी गोपाळकृष्ण मंदिर, भानुदास मंदिर, विठ्ठलवाडी, राममंदिर, दत्तमंदिर, किल्ले मारूती मंदिर मार्गे चौपाटीवर नेण्यात आली. यावेळी संपूर्ण विजयदुर्ग ग्रामस्थ, विजयदुर्ग पंचक्रोशीतील विठ्ठल भक्त फार मोठ्या संख्येने सामील झाले होते. यंदा वाड्ये वठार प्रहरकरी मंडळींची दिंडी असल्याने या प्रहरकरी मंडळींमध्ये मोठा उत्साह होता.

 

 

विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडत दिंडीची सांगता विजयदुर्ग चौपाटीवर करण्यात आली. यावेळी महिलांनी आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले. दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे विठ्ठलवाडी आणि वाड्ये बंधू यांनी सर्व प्रहरकरी मंडळींसाठी सुदर्शन वाड्ये यांच्या घरानजीक आठ दहीहंड्या एकत्रित बांधल्या होत्या. येथील उत्साह पाहण्यासाठी शेकडो विठ्ठल भक्तांनी गर्दी केली होती. श्रीदेव विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष महेश बिडये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली गेले 7 दिवस चाललेला दिवस रात्र अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.