संतप्त नागरिकांच्या कडवट प्रतिक्रिया, मिम्स आणि कार्टून्स
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहर आणि परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयासंदर्भात आता रत्नागिरीकर सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले असून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आणि उबाठा गटाने नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला असतानाच आता सामान्य रत्नागिरीकर सुद्धा त्याला मिळालेल्या व्यासपीठावरून या कारभारावर ताशेरे ओढताना दिसत आहे.
गेले महिनाभर रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. वास्तविक याला जरी ‘अति’ म्हटले गेले असले तरीही रत्नागिरीकराना अशा पावसाची सवय आहे. सरासरीपेक्षा जास्त जिथे पाऊस पडतो त्याला कोकण असे म्हटले जाते. त्यामुळे हा पाऊस नवीन नाही. मात्र याच पावसाने रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभारावरचा पडदा बाजूला केला आहे. जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पहिल्या दोन सरींमध्येच रत्नागिरी शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. रत्नागिरी शहर आणि परिसरात असा एकही रस्ता नाही जिथे खड्डा नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यात खड्ड्यांचे आकार आणि खोली पाहता वाहनचालक जीव मुठीत धरून वाहने चालवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खड्डेच पडू नये यासाठी मोठ्या कौतुकाने केलेल्या कॉंक्रीटच्या रस्त्यांमध्ये जो डांबराचा भाग जोडला आहे तिथेही खड्डे पडले आहेत. जिथे काँक्रिटीकरण होईल म्हणून चांगल्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी डांबर खडीचा नवीन थर घालण्यात आला तो थरच पावसाच्या एका जोरदार सरीत वाहून गेल्याचे उघड झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर पसरून त्यावरून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे.
रस्त्याच्या ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाचा आणि आपल्या कारभाराचा पोलखोल झाल्याचे लक्षात येताच नगर परिषद प्रशासनाने नेहमीप्रमाणे खड्ड्यांमध्ये डबर आणि चिरे भरण्यास सुरुवात केली तर यंदा नवा प्रकार म्हणून जिथे रस्ता वाहून गेला आहे तिथे उरला सुरला रस्ता खरवडून काढण्याचा नवा प्रकार आणि ठेकेदाराला नवे काम देण्यात आले. मात्र या दोन्ही उपायांमुळे खड्ड्यांवर उपाय मिळण्यापेक्षा रस्ता अधिकच धोकादायक झाला. मुसळधार पाऊस, पाण्याने भरलेले भले मोठे खड्डे आणि रस्त्यावरील बारीक खडी यामुळे अनेक ठिकाणी अनेक अपघात झाले, नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान सुद्धा झाले. आजही नागरिक जीव धोक्यात घालून शहरातील रस्त्यावरून वाहन चालवताना दिसत आहेत.
या सगळ्याचे परिणाम म्हणून उबाठा गटासह भारतीय जनता पक्षाने नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला. काही संतप्त नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी खड्ड्यात वृक्षारोपण सुद्धा केले. याची दखल घेताना पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदांमध्ये विरोधक खड्ड्यांमध्ये राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा केला आहे. येत्या १५ दिवसात शहरात उरलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
मात्र असे असले तरीही आता रत्नागिरीकरांमध्ये मात्र या ढिसाळ कारभाराबाबत प्रचंड संताप असून तो सोशल मिडियावरून व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेक जण त्यामध्ये सर्वसामान्य महिलाही, आपला राग व्यक्त करत आहेत. अनेक जळजळीत पोस्ट, मिम्स, कविता, विडंबने यातून हा राग व्यक्त केला जात आहे. रत्नागिरीतील सत्ताधार्यांवर हा सगळा रोष आहे. रत्नागिरीतील बस स्थानकापासून नळपाणी योजना, गटारे आणि रस्ते अशा सर्वसामान्य गरजाच रत्नागिरीतील सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीच हा राग दिसून येत आहे. गेले चार ते पाच वर्षे रत्नागिरीतील रस्ते चांगल्या स्थितीत नाहीत. नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, गस पाईप लाईन आणि मग काँक्रिटीकरण यांच्या नावाने रस्त्याची सातत्याने कामे काढली गेली, रस्ते तत्काळ खोदले गेले परंतु ते वेळीच दुरुस्त किंवा पूर्ववत केले नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना झाला. आता पुन्हा उरलेल्या शहरात काँक्रिटीकरण केले जाणार असून रस्त्याचा हा भाग दाट वस्तीचा आणि बाजारपेठेचा आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांनाही बसणार आहे. दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळ टर्मिनल बिल्डिग भूमिपूजनाची घोषणा केली असताना विमानतळ नको चांगले बस स्थानक आणि रस्तेच हवे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सगळ्या भावना जनता सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे.












