‘त्या’ विदेशी महिलेच्या आपबितीची अमेरिकन दूतावासा कडून गंभीर दखल

प्रकृती ढासळल्याने अधिक उपचारासाठी बांबोळीत हलविले

बांदा पोलिसांचे पथक तामिळनाडूला रवाना

पोलिसांवर तपासाचे आव्हान

बांदा (प्रतिनिधी) :
सोनुर्ली – रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडलेल्या अमेरिकन महिला नागरिक ललिता कायी कुमार एस हिला अधिक उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात रविवारी दुपारी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस तपासात अनेक गोष्टीचा उलगडा झाला असून तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल व टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व बांदा पोलीस पथके गोवा व तामिळनाडू येथे रवाना करण्यात आली आहेत. मडूरे रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये काहीही माहिती न मिळाल्याने प्रकरणाची संदिग्धता वाढली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल (शनिवारी) दुपारी तामिळनाडू येथील व मुळ अमेरिका येथील महिला रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले ४० दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक व चुकीची औषधे दिली. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली. अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी सायंकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र महिला प्रकृती अस्वस्थामुळे असंदीग्ध माहिती देत असल्याने पोलिसांसमोर माहिती मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

पोलीस आज पहाटेच घटनास्थळी रवाना
बांदा पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह पोलीस पथक आज पहाटे पाच वाजताच तपासासाठी घटनास्थळी रवाना झालेत. सदरचे ठिकाण हे मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर आतील जंगलात आहे. पोलिसांनी पायपीट करत घटनास्थळ गाठले. महिला ज्याठिकाणी सापडली त्या परिसरात पोलिसांनी कसून तपास केला. तसेच येथून मोबाईलचे लोकेशन घेतले. बांदा पोलिसांचे त्यानंतर महिलेचा जबाब नोंदविण्यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात रवाना झालेत. मात्र आज तिची प्रकृती अधिक ढासळल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्याचा सल्ला पोलीस प्रशासनाला दिला. त्यानुसार तिला लागलीच पोलीस बंदोबस्तात गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

मोबाईलमुळे गूढ उलगडणार
घटनास्थळी विदेशी महिलेकडे सॅक, मोबाईल, टॅब व ३१ हजार रुपये रोख सापडले. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला. मोबाईल मधून तिने कोणाला कॉल केलेत. तसेच या कालावधीत तिला कोणाचे कॉल आलेत हे उघड झाल्यानंतर या घटनेचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे.

उच्चशिक्षित महिला योगाभ्यासासाठी भारतात
जंगलात सापडून आलेली अमेरिकन महिला ही उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती. मात्र ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.

अमेरिकन दुतावासाची दखल
जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दुतावासाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात भारतीय सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करण्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याने पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे.

पोलीस पथके रवाना
महिलेकडे सापडलेल्या आधारकार्डवर तामिळनाडू येथील रहिवासी पत्ता असल्याने बांदा पोलिसांचे पथक हे तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले आहेत. गोवा राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या ही अधिक असल्याने गुन्हे अन्वेक्षण शाखेचे पथक हे गोव्यात तपासासाठी आज पाठविण्यात आले. आज गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली.

मडुरा रेल्वे स्थानकवरील सीसीटीव्ही फुटेज आज तपासी पथकाकडून तपासण्यात आले. मात्र त्या कालावधीत ती महिला निदर्शनास आली नाही. पथकाने गोव्यातील अनेक हॉटेल व लॉजची आज चौकशी केली. मात्र पथकच्या हाती फारसे काही लागले नाही.