जमिनीचे मालक श्री.लखमराजे भोसले यांचे शाळा भेटी वेळी आश्वासन..
वेंगुर्ले : प्रतिनिधी :उभादांडा-वेंगुर्ले येथील न्यू इंग्लिश स्कूल कडे जाणाऱ्या रस्ता विषया संदर्भात माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या सूचनेनुसार जमिनीचे मालक श्री.लखमराजे भोसले आणि सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष श्री.संजू परब यांनी शाळेच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली आणि शाळेचा रस्ता लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन श्री.लखमराजे भोसले यांनी शाळा संस्था, माजी विद्यार्थी आणि पालक यांना दिले आहे. त्यामुळे शाळेचा रस्ता प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या दिनांक ३ ऑगस्ट २०२४ च्या सावंतवाडी भेटी दरम्यान श्री.तुषार साळगांवकर, श्री.हितेश धुरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा,वेंगुर्ले या शाळेतील मुलांना जाण्यायेण्यासाठी त्रास होणाऱ्या रस्त्या संदर्भातील प्रश्नाचे निवारण करावे अशी विनंती केली होती. त्यानुसार ठरल्या प्रमाणे बुधवार ७ ऑगस्ट २०२४ रोजी जागा मालक श्री. श्री लखम राजे भोसले आणि संजू परब यांनी न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा या विद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली.
या वेळी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या अडचणींचीची माहिती घेतली. यावेळी जागा मालक श्री लखमराजे भोसले यांनी किमान दहा फूटांचा रस्ता विद्यालयासाठी लवकरात लवकर मोकळा करून देणार अशी ग्वाही दिली. तसेच शाळा संस्था आणि संबंधित कुटुंबीय यांच्या दोन्ही वकिलांकडून माहिती घेऊन, प्रशासकीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकरी यांची लवकरच भेट घेऊन कायदेशीर पणे विद्यालयाला रस्ता उपलब्ध करून देणार असे आश्वासन सुद्धा दिले. तसेच शाळेच्या इमारतीला त्रासदायक ठरणारे झाड चार दिवसात तोडून देण्याचे सुद्धा आश्वासन दिले.
विद्यालयच्या रस्त्या संदर्भात जो काही प्रश्न आहे तो सोडवण्या साठी मालक म्हणून आपण पूर्णतः सक्षम असल्यामुळे सदर प्रश्ना साठी आपल्याला कोणत्याही राजकारणी किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे मध्यस्थी साठी जायची गरज नाही असे ही त्यांनी सांगितले. याप्रसंगी श्री संजू परब यांनी श्री लखमराजे भोसले यांनी शाळा संस्था, माजी विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थी यांना दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल समस्त ग्रामस्थाच्या वतीने आभार मानले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा संस्था पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












