ठरले सावंतवाडीतील शिस्तबद्ध ६ थर रचणारे गोविंदा पथक
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवात चित्तथरारक ६ थर रचत सावंतवाडी शहरातील गोविंदा पथकांमध्ये अनोखे मानाचे स्थान पटकाविले. या कामगिरीसाठी भटवाडी संघाला सन्मानचिन्ह व ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसह सावंतवाडी शहर व तालुक्यात झालेल्या एकूणच दहीहंडी उत्सवात भटवाडी गोविंदा पथकाचा पुन्हा एकदा बोलबाला झाला.
सावंतवाडी बाजारपेठ दहीहंडी उत्सवामध्ये महापुरुष मित्र मंडळ गोविंदा पथकाने विविध ठिकाणी ५ थर व ६ थरांची सलामी देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. गतवर्षी स्थापन झालेल्या या गोविंदा पथकाने अल्पावधीतच केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली.
या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रियंक सरमळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व
छोटा गोविंदा समर्थ शेखर सुभेदार (६ वा थर) यांच्यासह भटवाडीतील सहभागी सर्व गोविंदांच्या अथक परिश्रमाला यश आले. यावेळी
प्रशिक्षक प्रियांक सरमळकर व आयोजक महापुरुष मित्रमंडळ आणि भटवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने पुढील वर्षी भटवाडीतील जास्तीत जास्त गोविंदांनी पथकामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावर्षीच्या गोविंदा महोत्सवात मिळविलेल्या यशाबद्दल भटवाडीतील सर्व गोविंदांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












