राजकोट किल्यावरील विकासकामांचे ठेके ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे 

 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पुरावेच दाखवले 

राडा संस्कृती वैभव नाईक यांचीच | राडा करायचा लपून राहायचे आणि पळून जायचे हेच यांचे धंदे 

मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला येथील राड्याला आमदार वैभव नाईक हेच जबाबदार आहेत. त्यांनी ॲक्शन दिल्याने आम्ही रिॲक्शन दिली. राडा संस्कृती वैभव नाईक यांचीच असून राडा करतात नंतर पळून जातात. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मताधिक्य कमी मिळाल्याने वैभव नाईक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात सुद्धा ते काहीही करतील. असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला.

 

दरम्यान राजकोट किल्ल्यातील अनेक विकास कामांचे ठेके ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीचे घेतले. असे सांगत चिंदरकर यांनी पुरावेच सादर केले. यात बाबा आंगणे आणि बाबा सावंत यांच्या संस्थानी विविध कामांचे चार ठेके घेतले. याची कागदपत्रे चिंदरकर यांनी सादर केली.

 

मालवण भाजप कार्यालय येथे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, दीपक पाटकर, जगदीश गावकर, पंकज सादये, उत्तम पेडणेकर, आबा हडकर, नितेश पेडणेकर, कमलाकर कोचरेकर यासह अन्य उपस्थित होते.

 

यावेळी चिंदरकर म्हणाले, राजकोट येथील घटना दुर्दैवी आहे मात्र त्याचे राजकारण होता नये. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. याचा विचार करता या सर्व प्रकारात जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच. पुतळा पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परंतु या पुतळ्याचा विषय घेऊन ठाकरे गट राजकारण करत आहे.

 

आमचे नेते खासदार नारायण राणे यांनी राजकोट येथे येण्याबाबत बारा वाजताची वेळ आधीच जाहीर केली होती. सर्व अधिकाऱ्यांशीही तशी चर्चा केली होती. असं असताना ठाकरे गट जाणून बुजन त्याचवेळी राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचला. समोरून ॲक्शन आल्याने आम्ही रिॲक्शन दिली. या घटनेत पोलिसांचीही चुक आहे. खा. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे राजकोट किल्ल्यामध्ये असताना आदित्य ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना किल्ल्यामध्ये सोडणे योग्य नव्हते. गेटवरील पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता राजकोट किल्ल्यात प्रवेश केला. राजकोट किल्ल्यात येऊन केलं काय? शेवटी अडीच तास किल्ल्यात कोंडून राहिले. आदित्य ठाकरे नेते म्हणवतात त्यांना लपून बसावे लागले. हीच का तुमची ताकद? तुमची कुवत आहे का? वैभव नाईक कधीचे निष्ठावान, ते ते तर काँग्रेस मधून आले आहेत. कार्यालय नासधूस हि राडा संस्कृती नव्हे का? ही राडा संस्कृती ही वैभव नाईक यांचीच आहे. ते सुरुवात करतात आणि नंतर पळून जातात. मात्र, आमचे नेते हे त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

 

पायाखालची वाळू सरकारली

 

लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात 40 हजार मताधिक्य कमी मिळाल्याने वैभव नाईक यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळे भविष्यात अजूनही काहीतरी वैभव नाईक घडवण्याची शक्यता आहे. मात्र भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली कोण राजकारण करत असतील तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही असा इशारा चिंदरकर यांनी यावेळी दिला.

 

राजकोट येथे तटबंदी कोसळली त्याच्यावर कारवाई व्हावी

 

राजकोट किल्ला येथे ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तटबंदीचे दगड कोसळले. याचा तपास करून कारवाई व्हावी. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.