वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष सौ. प्राची तावडे यांचा आरोप
वैभववाडी | प्रतिनिधी : मालवण राजकोट येथे राडा घडविण्याचे कटकारस्थान उबाठा गटाने रचले. भविष्यात त्यांना पराभव दिसत असल्याने असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष अध्यक्ष प्राची तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला.
जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता नियोजनबद्ध राडे घडून आणण्याचे कट कारस्थान उबाठाकडून सुरू आहेत. जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. परंतु झालेला विकास उबाठा गटाला बघवत नाही.
लोकसभेत त्यांचे पानिपत झाले आहे. आता विधानसभेतही त्यांना चारीमुंड्या चीत केले जाणार आहे. त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचे काम ते करीत आहेत. राणे साहेबांवर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. उबाठा गटाने भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यामुळेच राडा झाला. अशी टीका प्राची तावडे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभर माथे भडकविणारे राजकारण सुरू आहे. मात्र सिंधुदुर्गातील जनता त्यांना थारा देणार नाही. उबाठाने यापुढे गलिच्छ राजकारण सुरू ठेवल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सौ. तावडे यांनी दिला आहे.












