मंडणगड l प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा तालुक्यातील देव्हारे परिसरामधे मागील पंधरा दिवसापासून विज पुरवठा रात्री अपरात्री केंव्हाही खंडित होतो तर दिवसभरामधे वारंवार वीज पुरवठा बंद असतो. जेमतेम तीन ते चार तास लाईट पुरवठा सुरु असते अशी तक्रार देव्हारे परिसरातून नागरिक करत आहे.
सध्या देव्हारे विभागामधे सर्व कर्मचारी हे नविन भरतीमधील शिकाऊ असल्याने त्यांच्याकडून वीज ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याची परिसरातील नागरीकांची तक्रार आहे. मागील पंधरा दिवसापासून येथील वीज पुरवठा अनियमित आहे. सध्या गणेशोत्सव सुरु असून, या दिवसातही विजेचा लपंडाव सुरु असल्याने गणेश भक्तांमधे नाराजीचे वातावरण आहे. देव्हारे येथे असलेला विद्युत पुरवठा काही कारणांनी खंडित झाला तर महावितरणचे याकडे दुर्लक्ष होते. कधीकधी संध्याकाळ झाली तरीही गेलेली वीज सेवा सुरु होत नाही.
यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते. असे नागरिक तक्रार करू लागले आहेत. ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक हे दरमहा येणारे वीजबील न चुकता भरत असतात, मात्र एखाद्याचे दोनशे ते अडिचशे रुपये बील भरावयाचे राहिले असेल, त्या ग्राहकाचा फ्यूज आपला पुर्व कल्पना न देताच काढला जातो. याबाबत विचारणा केली असता नियमांवर बोट ठेवले जाते. एखाद्या ग्राहकाने वीज बील भरुनहीं फ्यूज नसल्याने ग्राहकास रात्री अंधारामधे रहावे लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत येथील नागरिक आता व्यक्त होऊ लागले आहेत.









