धुळ्यातून भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण अपघात जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या हिरे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. अशात धुळ्यात आज (रविवार, 15 सप्टेंबर) मोठा अपघात झाला. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पिक अप आणि ईको कारची समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व लोक वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर इको कारने घराकडे जात होते. दरम्यान, दसवेल फाट्याजवळ भरधाव वेगात आलेल्या पिकअपने त्यांच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या अपघातग्रस्त वाहनांची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती स्थानिकांना कळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने समोर आले आहे. चालकाला त्याला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.











