मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील चेतन पाटील याचा जामीन अर्ज नामंजूर

सिंधुनगरी | प्रतिनिधी

मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील बांधकाम सल्लागार चेतन पाटील याचा जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच डी गायकवाड यांनी ना मंजूर केला आहे.
या कामीअतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
मालवण येथे नौदल दिनानिमित्त आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अलीकडेच कोसळला होता. याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील आणि पुतळ्याचे शिल्पकार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात येऊन या दोघांनाही सुरुवातीला पोलीस कोठडी त्यानंतर सध्या दोघेही न्यायालयीन कोठडित आहेत. यातील बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर गुरुवारी सुनावणी झाली. यात पुतळा बांधताना तसेच पुतळा उभारताना ज्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते. त्या गोष्टींची काळजी घेतली नाही. त्याचबरोबर हा पुतळा उभारण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य चांगल्या प्रतीचे नव्हते आदि युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत डॉक्टर चेतन पाटील यांचा जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.डी गायकवाड यांनी नामंजूर केला आहे