राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा २१ रोजी चिपळूणात

 

 

पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी)ः आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनसन्मान यात्रा चिपळूणात शनिवारी २१ रोजी येत असून शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्ताने अजित पवार शहरातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. शिवाय विविध सामाजिक, सांस्कृतीक संघटनांशी तसेच नागरिकांशी संवाद साधणार आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोर २१ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

 

 

जनसन्मान यात्रेची माहिती देताना आमदार निकम म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पवार चिपळूणात येत आहेत. शनिवारी २१ रोजी दुपारी ३ वाजता सावर्डे येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर चिपळूणातील बहादूरशेखनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांस्कृतींक केंद्रापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केल्यानतंर जाहीर सभेला सुरवात होईल.

 

सभा संपल्यानंतर कापसाळ येथील माटे सभागृहात उपमुख्यमंत्री पवार विविध संघटना, महायुतीचे पदाधिकारी, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. शहरातील मुस्लीम समाजाच्या सभागृहास भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत. यात्रेच्या निमीत्ताने येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रीत केले आहे.

 

 

अजित पवार यांच्या पुढाकाराने तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराची ग्रॅव्हिटी पाणी योजनेस मान्यता मिळाली. त्याची निवीदा प्रक्रीया सुरू आहे. यापुढील कालावधीत शहराती भुयारी गटार योजना, भूमिगत विज वाहिन्यांचे जाळे, शहर व परिसरातील पुरनियंत्रण आराखडा, महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी शासनाकडून मोठ्याची निधीची गरज आहे. या प्रकल्पाबाबतही पवार यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.

 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रंथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, शहराध्यक्ष मिलींद कापडी, सौ. आदिती देशपांडे, सौ. दिशा दाभोळकर, जयंत शिंदे, डॉ. राकेश चाळके, निलेश कदम, मनोज जाधव, उदय चिखले, उदय ओतारी, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.