माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांनी महिलांच्या एकतेचे केले कौतुक
अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील धुरीवाडा येथील एका सौभाग्यवतीला तिच्या पतीनेच पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली. या घटने विरोधात मालवण मधील सर्वपक्षीय महिला वर्गाने एकत्र येत मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपी मोकाट सुटल्यास आम्ही शिक्षा देऊ असे ठणकावत एक इशाराच दिला.
मालवण तालुक्यातील सर्वपक्षीय, सर्वधर्म महिलांनी आवाज उठवून साऱ्या महाराष्ट्र वासियांना दाखवून दिले की त्या नराधमास आम्ही सोडणार नाही. मालवणात मुली, महिला यांवर अत्याचार किंवा दुखापत पोहचवण्याचा कुठलाही प्रकार यापुढे घडल्यास आम्हीच आरोपीना शिक्षा देऊ. ही भुमिका समस्त महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने बळ देणारी आहे. असे सांगत मालवणातील महिलांची एकसंघ कृती कौतुकास्पद आहे. अशी भुमिका मालवणचे माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांनी प्रसिद्धी पत्रातून मांडली आहे.
सुहास हडकर म्हणाले, मी माझ्या 43 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अशा प्रकारे सर्वप्रक्षीय सर्व धर्म महिलांचे उस्फूर्त धडाकेबाज आंदोलन पाहिलेला नाही, यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या, त्याबद्दल काही ठिकाणी मोर्चाही निघाले, आम्ही देखील अशा मोर्चात सहभागी घेतला. मात्र त्या घटना एक दोन दिवस बातम्या पर्यंतच मर्यादित राहिल्या, मात्र सर्वधर्मिय, सर्वपक्षीय महिलांनी एकत्र काढलेल्या मोर्चामुळे व मांडलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. महिला मोर्चा हा गरीब अत्याचारग्रस्त महिलांना आधार आहे. त्यामुळेच नराधमांनी आताच सावध व्हायला हवे. कोणतेही गैरकृत्य कराल तर आता तुमचाही कपाळ मोक्ष होईल असे देखील हडकर यांनी म्हटले आहे.












