माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांची माहिती
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत निधी मंजूरीचा शासनाचा अध्यादेश
राजापूर (प्रतिनिधी): शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूला नवीन पर्यायी धरणाच्या उर्वरीत कामांसाठी शासनाकडून आठ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मंजूरीचा शासनाचा अध्यादेश काढला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या सहीने हा अध्यादेश काढण्यात आला आहे.
गुरूवारी मुंबईत विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या दालनात झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत यावर निर्णय होऊन या कामासाठी निधी मंजूरीच्या अध्यादेशाची प्रत उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आपल्याकडे सुपुर्द केल्याचेही एड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने राज्यातील “नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानातुन राजापूर नगरपरिषद जि. रत्नागिरी करिता “राजापूर शहर पाणीपुरवठा नविन धरणाचे (कोदवली सायबाचे धरण) उर्वरीत बांधकाम करणे.” या कामासाठी रक्कम रु.८,१८,००,०००/- (अक्षरी रक्कम रु. आठ कोटी अठरा लक्ष मात्र) इतका निधी सदर कामाकरीता मंजूर करण्यात आल्याचे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
यासाठी डॉ. निलम गोऱ्हे यांसह राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राज्याचे मंत्री ना. शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप यांसह प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा निधी मंजूर झाल्याचे सौ. खलिफे यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धरणाच्या कामासाठी प्रारंभी दहा कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर मोठया प्रमाणावर काम वाढल्याने हा निधी अपुर्ण पडला व काम अपुर्णावस्थेत राहिले. त्यामुळे या उर्वरित कामासाठी निधी मिळावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. आपण यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. २०२३ मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अमिन पटेल यांनी तर विधानपरिषदेत आ. भाई जगताप यांनी लक्षवेधी द्वारे या धरणाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते. यावर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते.
विधानपरिषेद उपस्थित झालेल्या लक्षवेधीवर कार्यवाहीचे आदेश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले होते. यावर गुरूवारी सभापतींच्या दालनात विनंती अर्ज समीतीसमोर यासाठी बैठक झाली. यात नगर विकास विभागाकडून निधी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे नमुद करत तसा अध्यादेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदरच्या अध्यादेशाची प्रत डॉ. निलम गोऱ्हे यांनी समिती सदस्यांच्या उपस्थितीत आपल्याकडे सुपुर्द केल्याचे सौ. खलिफे यांनी सांगितले . याप्रसंगी विधानपरिषद सदस्य श्री. राठोड, श्री. आठवले, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन विस्पुते उपस्थित होते असेही सौ. खलिफे यांनी सांगितले.
शासनाने या कामाची दखल घेऊन यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा अध्यादेश काढल्याने आता रखडलेले हे काम मार्गी लागणार असून राजापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे. आपण कायमच राजापूर वासीयांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे.या कामी माजी नगराध्यक्ष अड. जमिर खलीफे यांनी देखील सातत्याने पाठपुरावा करतन निधी मंजूर होण्यासाठी व काम मार्गी लागण्यासाठी आग्रही मागणी करत पाठपुरावा केला होता. हे काम आता मार्गी लागणार असल्याने आपण समाधानी असल्याचे सौ. खलिफे यांनी सांगितले.
राजापूरातील या कोदवली येथील सायबाच्या धरणाला नवीन पर्यायी धरणाच्या कामाला सौ. खलिफे यांनी गती देत ते पुर्णत्वाला नेण्यासाठी यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे राजापूकरांकडून कौतुक होत असून अनेकांनी सौ. खलिफे यांचे अभिनंदन केले आहे.












