कणकवली : तालुक्यातील शिवडाव ओठोसवाडी येथील संशयित आरोपी गजानन चंद्रकांत शिरवडेकर याने पत्नीच्या माहेरी हरकुळ बुद्रुक येथे जावून दीपा चंद्रकांत शिरवडेकर हिच्या केसाला धरुन जमिनीवर पाडून गळ्याला दोन हाताने पकडून मारहाण केली. त्यानंतर धारधार कटरने हाताला जखमी केले. तसेच आरोपीने सासू – सासऱ्याना जीवे ठार मारण्याची धमकी देण्याची घटना शनिवारी रात्री १० :३० वाजता घडली.
याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी आरोपीची पत्नी दीपा शिरवडेकर ही काही दिवस माहेरी निघून गेली होती. पत्नी पुन्हा सासरी येणार होती, मात्र पती आणि पत्नी मध्ये काही कारणामुळे वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आरोपी गजानन चंद्रकांत शिरवडेकर याने पत्नी माहेरी गेल्याने हरकुळ बु. येथे जावून तिच्या केसांना पकडून जमिनीवर पाडून तुला ठार मारतो, असे म्हणत दोन्ही हाताने गळा आवळून धरले. त्यांचा व्रण देखील मानेच्या डाव्या बाजूला उठलेला आहे. तसेच खिशातून धारधार कटर काढला, आणि त्याने जिवंत ठेवणार नाही असे म्हणून गळ्याला लावण्यासाठी कटर काढले. तेव्हा पत्नी दीपा शिरवंडेकर हिने हाताने घट्ट पकडून बाजूला केले. त्यावेळी डाव्या हाताच्या पंज्याला आरोपी पतीने दुखापत केली. तसेच फिर्यादी पत्नी दीपा चंद्रकांत शिरवडेकर आणि तिच्या आई, वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.











