लांजा शहरात होणार सुसज्ज असे नाट्यगृह 

 

 

नगरसेवक संजय यादव यांच्या प्रयत्नांना यश, तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर 

 संतोष कोत्रे l        लांजा -: लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक संजय यादव यांच्या पाठपुराव्यातून आणि भाजपाचे नेते प्रमोद जठार यांच्या माध्यमातून शहरात लवकरच सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लांजा शहरातील नाट्यगृहाची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जाणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहरात नाट्यगृह नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या नाट्यप्रेमीची देखील गैरसोय होती. तर येणारी बहुतांशी नाटके ही लांजा हायस्कूलच्या रंगमंचावर होत होती. बऱ्याचदा अशा या प्रोफेशनल नाटकांसाठी लांजा हायस्कूलचा रंगमंच देखील अपुरा पडत होता. मात्र नाट्यगृह नसल्याने सर्व नाटके ही लांजा हायस्कूलच्या रंगमंचावर सादर केली जात होती.

विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या लांजा नगरपंचायतीमधील भाजपाचे नगरसेवक संजय यादव यांनी लांजा शहरात कोणत्याही परिस्थितीत सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा ध्यास घेतला होता. यासाठी प्रयत्न केले होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्यांनी सातत्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता.

अखेर भाजपाचे नेते प्रमोद जठार यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक संजय यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ठोक. निधीतून लांजा येथे सुसज्ज नाट्यगृह मंजूर झाले आहे त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे .त्यामुळे लवकरच लांजा शहरात सुसज्ज असे नाट्यगृह उभारले जाणार असून नाट्यप्रेमी आणि नाट्य कलाकार यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी देखील पूर्णत्वास जाणार आहे .

 

चौकट

संजय यादव-: याबाबत बोलताना नगरसेवक संजय यादव यांनी सांगितले की मुंबई गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा शहरात केवळ रस्ते, पाखाड्या या पुरताच विकास मर्यादित राहिला आहे.आणि म्हणूनच नाट्यगृह ही संकल्पना आपली असून नाट्यगृह उभारल्यास नामवंत कलाकारांची मांदियाळी या ठिकाणी आपल्या नागरिकांच्या भेटीला येणार आहे. आणि किंबहुना नामवंत कलाकारांची नाटके आणि त्यांना भेटण्याचा योग देखील या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.