चेंदवणकर दशावतार मंडळाचे संचालक देवेंद्र नाईक ‘ठाणे कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

 

सावंतवाडी : प्रतिनिधी : चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक यांना ठाणे कोकण रत्न पुरस्काराने विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ठाणे कोकण महोत्सवचे सर्वेसर्वा तथा सिंधुदुर्ग सामाजिक मंडळाचे सल्लागार दिलीप बारटक्के यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

यावेळी ठाणे कोकण महोत्सवाचे अध्यक्ष सुहास चव्हाण, दत्ताराम परब, उत्तम आंबेरकर, सुरेश रावराणे, अशोक पडवेकर, दीपक दुखंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र नाईक हे चेंजवणकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक आहेत ठाणे कोकण रत्न सन्मान पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग विकास मंडळाचे आभार मानले. ते म्हणाले, दशावतार कला ही कोकण व गोमंतकीयांचा श्वास आहे. या भागातील नागरिक दशावतार कला व कलाकारांवर भरपूर प्रेम करतात. हा सन्मान केवळ माझा नसून समस्त दशावतार कलाकारांचा आहे. देवेंद्र नाईक यांना ठाणे कोकण रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.