पेडणे (प्रतिनिधी) : मोरजी पंचायत क्षेत्रातील कान्नाईक वाडा परिसरात सुरू होणाऱ्या कॅसिनोला ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला. ग्रामसभेचा ठराव संबंधित खात्याला पाठवणार असल्याची माहिती यावेळी सरपंच पवन मोरजे यांनी दिली.
यावेळी ग्रामस्थांमध्ये विनोद पेडणेकर, विकी जोशी, मयूर शेटगावकर, भालचंद्र टेंबकर, श्री. मोरजे आदींनी हा प्रकल्प नको असल्याचे जाहीर करत सर्व ग्रामस्थांनी विरोध दर्शवून हा ठराव मंजूर करण्यास संमती दिली..
मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच पवन मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच सुप्रिया पोके, पंच रजनी शिरोडकर, पंच सदस्य मुकेश गडेकर, विलास मोर्जे, मंदार पोके, फटू शेटगावकर, सुरेखा शेटगावकर, स्वप्निल शेटगावकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला पंच सचिव सचिन कवठणकर यांनी स्वागत आणि मागच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला.
कान्नाईक वाडा मोरजी येथे भव्य इमारतीमध्ये कॅसिनो होत आहे. ही जागा आणि त्या जागेच्या परिसरात श्री काळोबा देवस्थान परिसर आहे. मोरजी गावात कसल्याच प्रकारचा कॅसिनो नको असल्याचे सांगून इमारतीलाही परवानगी देऊ नये. तसेच दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसा ठरावही ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर केला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात उंचावून ठरावाला मंजुरी दिली.
सरपंच पवन मोरजे यांनी सांगितले, सरकारच्या मंडळाने या इमारतीला परवाना दिलेला आहे. परंतु या इमारतीमध्ये कसल्याच प्रकारच्या केसिनोला मोरजी पंचायतीने परवाना दिलेला नाही. मोरजी पंचायतच्या सर्व पंच सदस्यांचा कॅसिनोला पूर्णपणे विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किनारी भागात जे स्थानिक पारंपारीक पद्धतीने ज्या घरात राहतात. त्या ठिकाणी सीआरझेडने घर दुरुस्ती व विस्तारित बांधकाम करण्यास आणि त्या बांधकामातून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.











