राजापूर | प्रतिनिधी : राजन साळवी … कोकणची वाळवी , एवढी माणसे कशाला राजन साळवीच्या मैताला .. अशी घोषणाबाजी करत आज प्रकल्प विरोधकानी चक्क पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसमोरच आमदार राजन साळवी यांचा उध्दार केला . मध्यंतरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ असलेले राजापूरचे आमदार राजन साळवी हे सध्या आपली भूमिका बदलून पुन्हा प्रकल्प विरोधात उभे राहिले असताना अशा घोषणा सोलगाव फाट्यावर प्रकल्पविरोधकानी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत .
रिफायनरी प्रकल्प बारसु येथे होण्यासाठी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राला पत्र दिल्यानंतर स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते . त्यानंतर ठाकरे सरकार गडगडल्यानंतर ही आमदार राजन साळवी कायम प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे होते . तर दुसरीकडे खासदार विनायक राउत हे सातत्याने प्रकल्पाच्या विरोधात होते . मात्र मागिल आठवड्यात बारसुचे आंदोलन पेटल्याने व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर पुन्हा आमदार राजन साळवी यानी यु टर्न घेत आपली भुमिका बदलली होती व प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली होती . सध्याचा त्यांचा विरोध हा दबावातुनच होता असे बोलले जात होते .
आज उध्दव ठाकरे बारसु दौऱ्यावर आले असताना त्यानी साखर येथून बारसुकडे येताना रस्त्यात मध्ये सोलगाव फाट्यावर काही प्रकल्प विरोधकांची भेट घेत चर्चा केली होती यावेळी उपस्थित प्रकल्प विरोधकानी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली आहे .











