एनएसएस मधून सुजाण,सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडतात – प्रा.नामदेव तळप

 

चिपळूण :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी औपचारिक शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेरील समाजशिक्षण आवश्यक असते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावखेडी, तेथील समाजकारण, अर्थकारण समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अशा अनुभवातून विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात. शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त, सामाजिक कार्य करण्याची संधी व प्रेरणा, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात. असे सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात असे मत डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे होणाऱ्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची ताकद युवाशक्तीमध्ये असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक स्व-विकासातून समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास साधण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतर प्रलोभनांपासून दूर राहत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. आजच्या प्रगतशील युगात मोबाईल ही गरज बनली असली तरी त्याचा वापर गरजेनुसार व मर्यादित करणे आवश्यक आहे असे मत मांडत शिबिराच्या यशस्वीतेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण जाधव यांनी प्रास्ताविकपर मनोगतात शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करत शिबिरादरम्यान राबविल्या जाणाऱ्या विविध व्याख्याने व उपक्रमांची माहिती देत या सर्व उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबिरातील प्रत्येक उपक्रमात प्रामाणिकपणे सहभाग घेत शिबिरादरम्यान त्यांच्यामध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर ही विचारांना कृतीची जोड देण्याची सुवर्णसंधी असून अशा संधीचा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मत व्यक्त केले.

चिंचघरी ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ.राकेश चाळके यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी शिबिरे जबाबदार नागरिक घडवत मोठ्या प्रमाणात सामाजिक योगदान देत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या पहिल्याच दिवशी केलेल्या श्रमदानाचे त्यांनी कौतुक करत यापुढे होणाऱ्या श्रमदानासाठी व विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
न. ए. सोसायटीचे सेक्रेटरी श्री.अतुल चितळे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व विशद करत या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य प्रकारे उपयोग करून गावाच्या प्रगतीसाठी व स्वतःच्या व्यक्तिमत्व विकसनासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत चिंचघरी ग्रामस्थांनी शिबिर घेण्याची संधी दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

या कार्यक्रमास चिंचघरी गावचे सरपंच श्री.राजेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य सौ.अनिता गुरव, सुकाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.महेश चाळके, श्री रमेश चाळके, पोलीस पाटील श्री.रोहन आग्रे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.दिनेश चाळके, श्री.दीपक गुरव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.अनिल कलकुटकी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. स्वप्निल साडविलकर,प्रा. विनायक बांद्रे, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. प्रदीप वळवी,प्रा.सौ मृण्मयी सोहोनी, बहुसंख्य ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ माधवी जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विठ्ठल कोकणी यांनी केले.