शिवगंध प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला रेकॉर्ड ब्रेक” प्रतिसाद!!! 

 

 

१९१ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

लांजा( प्रतिनिधी) रक्तदान हेच श्रेष्ठदान या ब्रीद वाक्यानुसार लांजातील शिवगंध प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून

आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले.

रक्तदानाविषयी लोकांच्या मनातील असणारे गैरसमज व भीती दूर व्हावी या उद्देशाने शिवगंध प्रतिष्ठानच्यावतीने कै.अद्वैत जाधव याच्या स्मृतीप्रित्यर्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संकल्पसिध्दी सभागृहात आयोजित या शिबीरात एकूण १९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवगंध संस्थेतर्फे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देत गौरव करून आभार व्यक्त करण्यात आले.

जिल्ह्यातील रेड क्रॉस रक्तपेढी, जिल्हा शासकीय रक्तपेढी व वालावलकर रक्तपेढी डेरवण अशा एकूण ३ रक्तपेढ्यांतील २५ हून अधिक स्टाफने मिळून रक्त संकलित केले. शिबिराला ५०० हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष भेट दिली.तर लांजा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तब्बल “१९१” रक्तदात्यांनी रक्तदान करत एक विक्रम रचला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवगंध प्रतिष्ठानच्या राजू जाधव व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.