रखडलेल्या निधीचे आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने वितरण
अपंग संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील, सचिव दत्ता कामतेकर यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण शहरातील सुमारे 103 अपंग सदस्यांचा नगरपरिषद स्तरावर रखडलेला निधी प्राप्त झाला आहे. याबाबत अपंग संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील आणि सचिव दत्ता कामतेकर यांनी आमदार निलेश यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, निलेश बाईत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.
नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता येणाऱ्या उत्पन्नाचा ५ टक्के निधी अपंग निधी म्हणून वाटप केला जातो. अपंगाच्या कल्याणासाठी काही वर्षांपूर्वी याबाबत शासननिर्णय करण्यात आला होता. त्यावेळी ३ टक्के अपंग निधी वाटप केला जात होता. २०१८ मध्ये या शासन निर्णयात सुधारणा करून अपंग निधी ५ टक्के करण्यात आला होता.
त्यानुसार नगर पालिकेला निधी वाटप करणे बंधनकारक आहे. अपंगत्वाच्या टक्केवारी नुसार तो निधी वितरित करण्यात येतो. दरवर्षी गणेश चतुर्थी किंवा दिवाळीच्या दरम्यान या निधीच वाटप केले जात होते. परंतु यावर्षी मात्र अपंग निधी देण्यात आलेला नव्हता. या संबंधी अपंग संस्थेमार्फत लेखी निवेदन देऊन ही निधीचे वितरण करण्यात आले नाही. निवडणुक आचासंहितेचा बागुलबुवा करुन निधी वाटप करण्यात आले नाही. दिवाळीच्या दरम्यान आचारसंहिता लागणार याची पूर्व कल्पना असूनही याबाबत कुठलीही आगाऊ कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत अपंग बांधवाना या निधी पासून वंचित रहावे लागले. शहराच्या विकास कामात अनास्था असणाऱ्या प्रशासकाकडून अपंगाच्या बाबतीतही हेळसांड करण्यात आली. असे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
अपंग निधी रखडला बाबतची माहिती प्राप्त झाल्यावर या बहुसंख्य अपंगाना घेवून आमदार निलेश राणे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी आमदार निलेश राणे यांनी माहिती घेऊन कार्यवाही केली. त्यांच्याच यशस्वी पाठपुराव्यातून आचारसहिता संपताच मालवण शहरातील १०३ अपंगाना त्यांच्या खाती निधी जमा करण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.












