काडवली येथील नियोजित धरणासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत धरणग्रस्तांची झाली बैठक

अधिकाऱ्यांनी केले ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन

चिपळूण | प्रतिनिधी :  खेड तालुक्यातील काडवली येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे नियोजित धरणाविषयी काडवली पाचघरवाडी येथील श्रीराम मंदिरात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत धरणग्रस्त व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी धरणग्रस्त तसेच ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. या धरणाला येथील ग्रामस्थांनी सकारात्मकता दर्शवली. या कामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे.

काडवली येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे धरण मंजूर झाले असून या धरणाच्या कामाविषयी तसेच मोबदला व अन्य प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत धरणग्रस्त व ग्रामस्थांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा लांबे होते बैठकीच्या सुरुवातीला सरपंच सौ. भक्ती महाडिक यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी जलसंधारण विभाग चिपळूणचे अधिकारी सागर भराडे यांनी काडवली येथे होत असलेल्या धरणाविषयी तांत्रिक माहिती देताना सांगितले की, सदरील धरण मातीचे असून धरणाची ३१५ मीटर लांबी असून उंची ३३ मीटर उंची आहे. या धरणाच्या कामासाठी ५५ कोटी २८ लाख ४८हजार ८३५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा ठेका खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून या कामाचा कालावधी ४ वर्षांचा आहे, अशी माहिती यावेळी दिली. तर भूसंपादन अधिकारी खेड अशोक खेतले यांनी भूसंपादन, कृषी अधिकारी जगदीश शिंदे यांनी वृक्ष मोजणी, भूमी अभिलेख मोजणी अधिकारी मंदार पाटकर यांनी भूमी मोजणी प्रक्रियेविषयी माहिती दिली.

यानंतर धरणग्रस्त विजय राणे, जगदीश महाडिक, वसंत पड्याळ दीपक खाडे, अंकुश जाधव, संकेत सावंत आदी धरणग्रस्त व ग्रामस्थांनी धरणाविषयी तांत्रिक सखोल माहितीसंदर्भात, मोबदला, भविष्यात स्थलांतर, धोके आदी प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थितीतांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी पोलीस पाटील संभाजी महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश महाडिक, माजी सरपंच जगदीप महाडिक, माजी सरपंच रमेश मांजरेकर, माजी उपसरपंच राकेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर चव्हाण, माजी सदस्य मनोज काजवे, वसंत खाडे, विनायक महाडिक, विष्णू जाधव, महेश काजवे, परशुराम जाधव, मिलींद महाडिक, प्रशांत महाडिक, मयुर महाडिक, संतोष उर्फ पप्पू महाडिक, शिवराम महाडिक, धोंडू महाडिक, संतोष सावर्डेकर अधिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा लांबे यांनी अध्यक्षीय भाषणात या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. नंतर जलसंधारण विभागाचे अधिकारी सागर भराडे यांनी धरण होत असलेल्या ठिकाणी धरणग्रस्तांना तांत्रिक माहिती दिली.